top of page
Writer's pictureMahannewsonline

राज्यातील 'या' बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध; ग्राहकांना फक्त १० हजार काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी महाराष्ट्रातील एका बँकेवर कारवाई करत अनेक निर्बंध घातले. त्यानुसार आता ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बँकेच्या आर्थिक स्थितीत गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरबीआयने 'नगर अर्बन को-ऑपरेटिव बैंक लि., अहमदनगर' या बँकेवर निर्बंध लादले आहेत.

बँकिंग व्यवस्थापन कायदा, १९४९च्या नियमांतर्गत नगर अर्बंन सहकारी बँकेवर ६ डिसेंबरपासून सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू केले आहेत. सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. या निर्बंधामुळे बँकेच्या खातेदारांना केवळ १० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्याचप्रमाणे बँकेला कोणतेही नवीन कर्ज देण्याला बंदी करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या परिसरामध्ये लावावी, त्यामुळे खातेदारांना त्याची माहिती मिळू शकेल, असे रिझर्व्ह बँकेने बजावले आहे.

नगरसह राज्यातील अन्य जिह्यात तसेच गुजरातमध्येही या बँकेच्या शाखा आहेत. दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. दोन वर्षे प्रशासकाने काम पाहिले. अखेर बँकेची पुन्हा निवडणूक घेण्यात आली. गेल्याच आठवड्यात नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला आणि त्याचे सत्कार सोहळे सुरू असतानाच बँकेवर निर्बंध लादल्याचा आदेश आल्याने बँकेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.



bottom of page