top of page
Writer's pictureMahannewsonline

राज्यातील "या" सहकारी बँकेचा परवाना रद्द; तुमचे खाते तर ‘या’ बँकेत नाही ना?

भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील एका सहकारी बँकेवर कारवाई करत बँकेचा परवाना रद्द केला आहे. सांगली जिल्ह्यातील "सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक" असं परवाना रद्द करण्यात आलेल्या बँकेचे नाव आहे. बँकेकडे व्यवहारासाठी पर्याप्त भांडवल नसल्यामुळे तसेच आरबीआयने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे आता या बँकेला यापुढे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. त्याचबरोबर सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. असं आरबीआयने सांगितले आहे. बँकेवर अचानक कारवाई झाल्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरन्टी कॉर्पोरेशन अंतर्गत (डीआयसीजीसी) प्रत्येक खातेदाराला त्याने जर पाच लाखांच्या आत रक्कम ठेवली असेल तर ती संपूर्ण रक्कम किंवा पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम असेल तर पाच लाख रुपये मिळतील. ही रक्कम खातेदारांच्या दुसऱ्या बँक खात्यावर जमा केली जाईल. असंही आरबीआयने म्हंटलं आहे.


bottom of page