top of page
Writer's pictureMahannewsonline

रेखा जरे हत्याकांड : प्रेमसंबंध... वादावादी.... बदनामीच्या भीतीपोटी घडवलं हत्याकांड

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र पारनेर न्यायालयासमोर सादर करण्यात आलंय. साडे चारशे पानांच्या या दोषारोप पत्रात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले आहे. तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

बाळ बोठे आणि रेखा जरे यांच्यातल्या प्रेमाचा अँगल समोर आलाय. बाळ बोठे आणि रेखा जरे यांचे खूप दिवस प्रेमसंबंध होते. त्यांच्या या नात्यात क्षुल्लक कारणांवरुन वारंवार वादावादी व्हायच्या. अनेक वेळा त्यांच्यातल्या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. यानंतर या प्रकरणात आपली बदनामी होईल या भीतीपोटी बोठेने हे हत्याकांड घडवलं, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे.

बोठेसह त्याचे साथीदार अकुला चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल अली, अब्दुल अरिफ आणि महेश तनपुरे यांच्याविरोधातही दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. बोठेविरोधात कट रचून खून करणे तर त्याच्या साथीदारांवर त्याला फरार होण्यास मदत करणं या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आलाय.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीच्या काही दिवसांतच पाच आरोपींना अटक केली होती. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बोठे हा तीन महिने फरार होता. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याच्या शोधासाठी पाच पथकांची नियुक्ती केली होती तीन महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर बोठे हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हैदराबादमध्ये कारवाई करून बोठेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले. त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या अन्य सहा आरोपींनाही अटक करून त्यांना पारनेर न्यायालयासमोर हजर केले, अशी माहिती अजित पाटील यांनी दिली.


bottom of page