top of page
Writer's pictureMahannewsonline

ऋतुराज गायकवाडची सलग तिसऱ्यांदा शतकी खेळी; शिखर धवनची जागा धोक्यात?

विजय हजारे स्पर्धेत सलग तीन सामन्यात धमाकेदार शतकी खेळी करत महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी आपली दावेदारीही सिद्ध केली आहे.

केरळविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात ऋतुराजने शतकी खेळी केली. ऋतुराजचे विजय हजारे स्पर्धेतील गेल्या ३ सामन्यातील हे तिसरे शतक ठरले आहे. केरळविरुद्धच्या सामन्यात त्याने १२४ चेंडूत १२९ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. याआधी ऋतुराजने मध्य प्रदेश विरुद्ध ११२ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह १३६ धावांची खेळी केली होती. तर छत्तीसगड विरुद्ध च्या सामन्यात १४३ चेंडूत नाबाद १५४ धावांची खेळी केली होती.त्याने ३ सामन्यात आतापर्यंत ४१४ धावा केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यात ऋतुराजने शानदार कामगिरी केली असून आयपीएल २०२१ मध्ये त्याने सर्वाधिक ६३५ धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. तसेच ऋतुराज सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या स्पर्धेत ऋतुराजने 5 डावांमध्ये 259 धावा केल्या होत्या.

दरम्यान, शिखर धवन गेल्या काही काळापासून अपयशी ठरतोय. त्यामुळे त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्येही संधी देण्यात आली नव्हती. तसेच विजय हजारे स्पर्धेत धवन दिल्लीकडून खेळतोय. धवनची या स्पर्धेतील सुरुवातही अपेक्षेप्रमाणे राहिलेली नाही. त्यामुळे निश्चितच धवनचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आलं आहे. तर दुसरीकडे विजय हजारे स्पर्धेमध्ये ऋतुराजने धमाकेदार खेळी केल्याने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


bottom of page