top of page

राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. साधारण दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज पहाटे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जून १९६० साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल आयकर अधिकारी होते. केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ साली भारतीय शेअर बाजारामध्ये आपली कारकीर्द सुरू केली होती. राकेश झुनझुनवाला यांनी सर्वात आधी ‘टाटा टी’ संदर्भात व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला आणि १९८६ साली त्यांना पाच लाखांचा नफा झाला. त्यांनी ४३ रुपयांना ‘टाटा टी’चे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ रुपयांपर्यंत वाढली. त्यामुळेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिपटीहून अधिक पैसा त्यांना या शेअरमधून मिळाला.

१९८७ मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. अंधेरीत राहणाऱ्या रेखा या स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदार होत्या. २००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म ‘RARE' एन्टरप्रायझेस’ची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते.

सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे झुनझुनवाला होते. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं. यामुळेच मध्यमवर्गीयांचे राकेश झुनझुनवालांच्या टिप्पणीकडे, त्यांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लक्ष असायचं. ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स आहे.




bottom of page