top of page
Writer's pictureMahannewsonline

फिल्मी स्टाईल दरोडा; 12 मिनिटांत 17 किलो सोनं केलं लंपास

सोनं तारण ठेवून कर्ज देणाऱ्या मणप्पुरम फाइनेंस लिमिटेड कंपनीच्या चुरु येथील शाखेत चोरट्यांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकत अवघ्या 12 मिनिटांत 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपये घेऊन पसार झाले. ही घटना राजस्थानातील चुरू येथे घडली. मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई करत अवघ्या तीन तासात चोरट्यांना जेरबंद केलं आहे.

सोमवारी मणप्पुरम फाइनेंस लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होतं. दुपारी पूर्णपणे तोंड झाकलेल्या तरुणांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी कार्यालयात शाखाधिकाऱ्यासोबत अन्य चार कर्मचारीच होत. कोरोनामुळे ग्राहकांनी तोंड झाकलं असावं असं कर्मचाऱ्यांना वाटलं. यावेळी एका चोरट्याने सोनं तारण ठेवून कर्ज घ्यायचं असल्याची बतावणी केली. त्याचबरोबर आपल्याकडील सोन्याची अंगठीही कर्मचाऱ्याकडे दिली. यानंतर संधी साधून चोरट्यांनी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद केले. शिवाय कर्मचाऱ्यांचे मोबाईलही हिसकावून घेतले. यानंतर आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत कंपनीतील 17 किलो सोनं आणि 8.92 लाख रुपयांची रोकड लंपास केली.

कंपनी बाहेरील सीसीटीव्‍हीमध्‍ये ही फिल्‍मी स्‍टाईल चोरी कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्‍ही फुटेजवरुन दुचाकीचे नंबर तपासले. त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांनी राजस्‍थान आणि हरियाणा सीमेवर नाकाबंदीही केली. मात्र चोरट्यांनी चुरू याठिकाणी आपली दुचाकी सोडून कारने पसार होण्याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी 9 कोटींच्‍या ऐवजासह 2 चोरट्यांना जेरबंद केलं. अद्याप दोन चोरटे फरार असून त्याचा शोध सुरू आहे.


bottom of page