top of page
Writer's pictureMahannewsonline

शहीद जवान रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये सांगली जिल्ह्यातील शिगाव (ता. वाळवा ) येथील रोमित तानाजी चव्हाण यांचा समावेश होता. आज सकाळी वारणा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर शिगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

रोमित ५ वर्षापूर्वी मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफलमध्ये पोस्टिंग झाले. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.

शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव सकाळी 6.50 च्या सुमारास शिगाव गावात दाखल झाले. पार्थिव गावात येताच अमर रहे अमर रहे, रोमित चव्हाण अमर रहे, जब तक सुरज चाँद रहेगा रोमित तेरा नाम रहेगा, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा गावकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली. पार्थिव प्रथम त्यांच्या राहत्या घरी आणून कुटुंबीय व नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. घराजवळ आणि गावाच्या कमानीजवळ लोकांनी मोठी गर्दी केली होती. दुतर्फा रांगोळी काढलेल्या व फुलांनी सजवलेल्या रस्त्यावरून शहीद रोमित चव्हाण यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील मध्यवर्ती हुतात्मा राजेंद्र पाटील चौकात सकाळी 7.45 च्या दरम्यान त्यांचे पार्थिव गावकऱ्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावकरी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी जनसमुदायांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. सकाळी 8.50 वाजता पार्थिव वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. यावेळी सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. वारणा काठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर वडील तानाजी चव्हाण यांनी मुखाग्नी दिला. शहीद रोमित चव्हाण अनंतात विलीन झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी वीरपिता तानाजी चव्हाण यांच्याकडे राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. शहीद रोमित चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे वडील तानाजी चव्हाण, आई वैशाली चव्हाण, बहिण तेजस्विनी असे कुटुंबीय आहेत.


वारणा काठची परंपरा शूरत्वाची, वीरत्वाची आहे. याच परंपरेशी नाते सांगणारा शहीद  रोमित चव्हाण लहानपणापासूनच सैन्यामध्ये भरती होण्यासाठी स्वप्न बाळगून होता. बारावी झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी त्यांचे स्वप्न पूर्ण झाले व तो सैन्यामध्ये भरती झाला.  जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या शोघ मोहिमेतील पथकामध्ये काम करत असताना शोध मोहिमेदरम्यान एका घरामध्ये लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या एका साथीदारावर अगदी जवळून गोळीबार केला. त्यामध्ये त्यांना वीरमरण आले. अशा या धाडसी रोमित चव्हाण यांचा अभिमान वारणा काठच्या लोकांबरोबरच सर्व देशाला कायम राहील.  शहीद  रोमित यांच्या कुटुंबियांना हा बसलेला धक्का न पेलवणारा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या या शोककाळात आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. - पालकमंत्री जयंत पाटील 


bottom of page