top of page

ऊसतोड मजूराच्या घरी झालेल्या अनोख्या स्वागताने रोहित पवार भारावले ...

कर्जत-जामखेड मतदारसंघचे आमदार रोहित पवार सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते त्यांच्या कामाबद्दल, मतदारसंघातील लोकांबद्दल, आणि अन्य अनेक गोष्टींबद्दलची माहिती सोशल मीडियावरून सगळ्यांपर्यंत पोहचवत असतात.आज अशीच एक पोस्ट त्यांनी केली. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत असून रोहित पवारांचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे.

सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता. तसेच त्याच्या मेंदूलाही जबर मार लागला होता. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचारासाठी रोहित पवारांनी मदत केली. म्हणून त्या मुलाचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून रोहित पवार याना घरी बोलावलं. या संर्दभात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

"घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला.” असं रोहित पवार यांनी म्हंटलं आहे. रोहित पवारांच्या या पोस्टला आत्तापर्यंत अनेकांनी लाइक केलं असून रोहित पवारा यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहे.


bottom of page