top of page
Writer's pictureMahannewsonline

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. बंगळुरू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची ते जागा घेणार असून भैयाजी जोशी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाणार असल्याचं वृत्त आहे. होसबळे २००९ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 'सह-सरकार्यवाह' पद सांभाळत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं पद आहे.


गेल्या दोन दिवसांपासून बेंगळुरूमध्ये संघाच्या प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आज झालेल्या या सभेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सद्य सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर होसबळे यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आलीय. दत्तात्रय होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल



२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि २०२५ ला संघ शताब्दी वर्षानिमित्त होणारे विविध कार्यक्रम लक्षात घेता संघ आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने सरकार्यवाहपदावर होणारी निवड महत्त्वपूर्ण मानली जात होती. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दीर्घकाळ या पदावर काम करताना संघटनात्मक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचीच फेरनिवड होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्यांचे वाढते वय पाहता त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असाही एक मतप्रवाह संघात होता.



bottom of page