top of page
Writer's pictureMahannewsonline

"माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही..." म्हणत भाजपच्या माजी आमदाराने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधासभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी गुरुवार (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुबंई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. यावेळी पाटील यांनी भाजपवर निशाणा साधल्यानंतर तोडसाम यांनीही थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

राज्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. या धामधुमीत राष्ट्रवादीने यवतमाळमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरू नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे ही आमच्यासाठी मोठी बाब आहे, राजू तोडसाम यांच्या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

राजू तोडसाम यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'मी भाजपमध्ये १० वर्षे काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालत राहिलो. मला २०१४ साली आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आदिवासींच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवत असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी माझे २०१९ च्या निवडणुकीत तिकीट कापले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांनी मला बोलावून पक्षात थांबायला सांगितले. मात्र मी राष्ट्रवादीतच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप सोडत असताना माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही. मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही. चौकशी केली तरी काही सापडणार नाही', असे तोडसाम म्हणाले.


bottom of page