top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी

सोलापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3733 मतांनी पराभव केला. समाधान आवताडे यांना 109450 मते पडली तर भगीरथ भालके यांना 105717 मते पडली. पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली असून ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही प्रतिष्ठेची केली होती.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 524 मतदान केंद्रावर 2 लाख 34 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शासकीय गोदामात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आले होते. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीपासून भगीरथ भालके आणि समाधान अवताडे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सुरुवातीला कल बदलताना दिसत होता. मात्र काही फेऱ्यांनंतर समाधान आवताडे यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. मतमोजणीच्या एकूण 38 फेऱ्या पार पडल्या. 38 व्या फेरी अखेर समाधान आवताडे यांनी 3733 मतांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला.


bottom of page