top of page

राज्यसभा निवडणूक निकालांनंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. मात्र शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. त्यानंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आज सूचक ट्वीट केलं आहे. ट्विटद्वारे त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

संभाजीराजे यांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग ट्वीट केला आहे. "वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं | तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय |" असं ट्विट करत संभाजीराजे यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत.


“वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”. असा या अभंगाचा अर्थ आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. शिवसेनेचे संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. राज्यसभेच्या ६ जागांपैकी ३ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार तर ३ जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे.


bottom of page