top of page
Writer's pictureMahannewsonline

... तर खासदारकी सोडली असती – संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोल्हापूर आणि नाशिकनंतर आता नांदेडमधून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांसमोर बोलताना खासदार संभाजी राजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. त्याचबरोबर आपण संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि त्यासाठी लढण्याची भूमिका मांडली, असंही ते म्हणाले. संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी मला संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना संभाजीराजेंनी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दाखले देत स्वराज्याचा अर्थ समजावून सांगितला. स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण संसदेतही मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडली हे सांगताना संभाजीराजे म्हणाले, मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही.आपल्याकडे समाजाची ताकद आहे. शिव-शाहूंचा वारसा आहे. हा वारसा गप्प बसणार का? शिवाजी महाराजांनीही औरंगजेबला धुडाकवून लावलं होतं. त्यामुळे त्याच दिवशी मी ठरवलं होतं. त्या दिवशी बोलायला दिलं नसतं तर अरे कुठली खासदारकी, सोडून टाकली, असं म्हणून मी बाहेर पडणार होतो. पण नंतर मला बोलायला संधी दिली. तेव्हा माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी सरकारला सवाल केला. ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्या पणतूला तुम्ही दोन मिनिटं बोलायला देत नसेल तर उपयोग काय माझा अशी सुरुवात मी केली, असं सांगतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी मला बोलता यावं म्हणून मदत केली. त्यांचे आभार मानतो, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीकाही केली आहे. ते म्हणाले, “मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.”


bottom of page