top of page

सावधान! पाण्याची पातळी वाढत आहे… तातडीने स्थलांतरीत व्हा – जिल्हाधिकारी

स्थलांतरितांना शुद्ध पाणी, चांगले भोजन द्या, पशुधनाचे संरक्षण करा, चारा उपलब्ध करुन द्या, निवारा केंद्राच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी प्राधान्याने करा – प्रशासकीय यंत्रणांना निर्देश

सांगली : पाण्याची पातळी वाढत आहे. सावधानता बाळगा, तातडीने स्थलांतरीत व्हा, शासन आपल्या पाठीशी असल्याने घाबरुन जाऊ नका, जिल्हा प्रशासनाने निर्माण केलल्या निवारा केंद्रांमध्ये साहित्य, जनावरांसह सुरक्षितपणे पोहोचा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मौजे डिग्रज, भिलवडी माळवाडी परिसरातील साठेनगर, वसंतनगर, मौलाना नगर, दत्तनगर या पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज प्रातांधिकारी समीर शिंगटे, कडेगाव प्रातांधिकारी गणेश मरकड, तहसिलदार निवास धाने, जिल्हा आरोग्य अधिकारी मिंलीद पोरे संबधित ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पावसाचा जोर वाढतच असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरीभागात पाणी शिरत असून अनेक कुटुंबे स्थलांतरीत करावी लागत आहेत. ही कुटुंबे स्थलांतरीत करीत असताना संबधितांनी प्रशासनास सहकार्य करावे. जास्तीत जास्त दिवसाच्या वेळी स्थलांतरीत व्हावे, रात्रीच्यावेळी अचानक पाणी वाढल्यास स्थलांतरण प्रक्रिया करणे जिकरी होते व श्वापदांचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच पुरग्रस्त भागांमध्ये बोटींद्वारे रेस्क्यु ऑपरेशन करण्याची वेळ येवू नये याबाबत दक्षता घेण्यात यावी.

पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रांवर सुविधा चांगल्या प्रकारच्या पुरविण्यात याव्यात. त्यांना देण्यात येणारे भोजन, चांगल्या प्रतीचे असावे. त्याचबरोबर शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा. विस्तापित झालेल्या लोकांबरोबरच त्यांच्या पशुधानाचेही संरक्षण करण्यात यावे. त्यासाठी त्यांना चाराही उपलब्ध करुन देण्यात यावा. असे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, भिलवडी – माळवाडी भागात दोन निवारा केंद्रे निर्माण करण्यात आली असून या ठिकाणी आतापर्यंत 398 लोकांना व 350 जनावरांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जसजसे पाण्याची पातळी वाढेल त्या नुसार नागरीभागातील लोकांचे स्थलांतर करण्यात यावे. निवारा केंद्रांच्या ठिकाणी कोरोना चाचणी प्राधान्यांने करण्यात यावी. ज्या व्यक्ती पॉझिटीव्ह अढळतील त्यांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर हे प्राधान्यांने पुरविण्याबरोबरच प्राथामिक औषधे उपलब्ध करण्यात यावेत. निवारा केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाराऱ्याची नेमणूक करण्यात यावी. तसेच पूरग्रस्त क्षेत्रात जास्तीजास्त सुविधा पुरविण्यावर प्राधान्य द्यावे.


bottom of page