top of page

कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी करण्यासाठी कडक धोरण राबवा

सांगली : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर 10 टक्क्यांपर्यत खाली आला असताना वाळवा तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर 13 टक्के आहे. वाळवा तालुक्याचा पॉझिटिव्हिटीचा दर कमी करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मोकाटपणे फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करावी, पोलिसांनी गस्त वाढवावी असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

गटविकास अधिकारी वाळवा यांच्यावतीने व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वाळवा तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, वाळव्याचे गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, इस्लामपूरचे पोलीस निरिक्षक एन.एस. देशमुख, आष्टाचे पोलीस निरीक्षक बी.आर. निंभोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध ग्रामपंचयातींचे सरपंच यावेळी सहभागी झाले होते.

वाळवा तालुक्यात सद्यस्थितीत 1 हजार 749 कोरोना बाधित रुग्ण आहेत. कोरोनाचे 32 हॉटस्पॉट आहेत तर कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 13 टक्के आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना पॉझिटीव्हचा रिपोर्ट येणाऱ्या व्यक्तींच्या घरातील सर्वांची टेस्ट करण्यात यावी. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढविण्यावर भर दिला पाहिजे, टेस्ट करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त केले पाहिजे, यामुळे अदृष्य केसेस समोर येतील. टेस्टींगचे प्रमाण वाढले की. बाधित रुग्णांची संख्या वाढेल पण त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होईल. बरेचसे लोक लक्षणे जाणवल्यास खाजगी डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट न करताच उपचार घेतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जास्त होतो. अशा वेळी खाजगी डॉक्टरांनीही अशा बाधितांची माहिती शासकीय यंत्रणांनी दिली पाहिजे.

कोरोना बाधितांची संख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये स्थानिक प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरण करण्यावर जास्त भर दिला पाहिजे. गावच्या सरपंचानी व दक्षता समित्यांनी दक्ष राहून काम करणे आवश्यक आहे. गावात कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी प्रसंगानुरुप कडक धोरण अवलंबविले पाहिजे. संस्थात्मक विलगीकरण सक्तीने केले पाहिजे, अशा सूचना करुन पालकमंत्री जयंत पाटील यांनी कामेरी, येडे निपाणी, पेठ, बागणी, नेर्ले, वाटेगाव, मालेवाडी, कासेगाव, रेठरेधरण, भडकंबे, वाळवा, शिगाव, साखराळे, गोटखिंडी, बावची, ऐतवडे खुर्द व बुद्रूक, येलूर, चिकुर्डे, तांबवे, कुरळप, कार्वे, नवेखेड या गावच्या सरपंचांशी संवाद साधला व त्यांनी गावात राबविलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली.


bottom of page