top of page
Writer's pictureMahannewsonline

खरे संस्कार घरातूनच!


शिक्षण हे संस्कारी तत्वावर आधारलेलं असावं.त्या शिक्षणातून मान सन्मान वाढावा.मुलांनी मोठे झाल्यावर आबालवृद्धांचा तसेच लहान थोरांचाही सन्मान करायला हवा.अलिकडे आपण पाहतो की मुलांमध्ये मानपानच उरलेला नाही. ती मुले लहान मुलांशी तर वात्रटपणे वागतातच.शिवाय मोठ्या माणसांशीही वात्रटपणे वागतात.मोठी माणसं या वात्रटपणामुळं त्रस्त असतात. मुले संस्कारी निव्वळ शाळेतूनच तयार होतात असे नाही.तर ते परीसरातूनही संस्कारी होत असतात.नव्हे तर असे संस्कार घरातूनही मिळत असतात. त्यासाठी मुलं घरी जे आईवडीलांचं ऐकतात.तेच संस्कार सर्वात जास्त रुजत जातात मुलांवर.


पूर्वी कुटूंब हे संस्कार करण्याचं केंद्र होतं. कुटूंबातील संस्कारी भट्टीत मुलांना हवं तसं वळवून त्यांना चांगलं नागरीक बनवलं जात होतं.त्यानुसार मुलांमध्ये आदर्श मानसन्मानाचे संस्कार रुजायचे.अशी मुले आबालवृद्धांना, आजीं-आजोबांना सन्मान देत. कारण त्यांचे मायबापच आपल्या आईवडीलांच्या आज्ञेत असायचे. ते मायबापाचे वागणे पाहून साहजिकच मुले आज्ञाकारी बनत. मुलीही स्नुषा म्हणून गावात आल्यानंतर आबालवृद्धांसमोर अदबीनं डोक्यावर पदर घेत, खाली मान टाकून चालत असत.तेच गुण त्यांच्या मुलांमध्येही उतरत.तो प्रकार आज दिसत नाही. कारण आज कोणत्याही स्नुषा सासरी आल्यावर वडीलधारी मंडळींसमोर डोक्यावर पदर घेवून चालत नाही.खाली मान टाकून तर नाहीच नाही. मग त्यांची मुलं का चालतील.हेच संस्कार आधुनिक शिक्षणानं मुलांमध्ये रुजले.


एक प्रसंग असा आहे आजच्या आधुनिक संस्कारी काळातला एका म्हाता-याचं स्नुषेसोबत काही शुल्लक कारणानं भांडण सुरु होतं.तेव्हा ती स्नुषा त्या म्हाता-याला बोलत होती. 'This is my home. get out.'

नेमकं कोणाचं घर.ते म्हाता-याच्याच मालमत्तेतून साकार झालेलं घर.म्हातारा जो होता.त्यानं आपल्या एकुलत्या एका मुलाला शिकवलं.लहानाचं मोठं केलं.त्यातच त्याला सरकारी नोकरीही लागली.त्यानंतर त्याला सरकारी नोकरी लागताच योगायोगानं त्याला नोकरी करणारी मुलगी पत्नी म्हणून मिळाली.मग काय दोघंही नोकरी करीत होते. दोघांचाही पैसा बक्कळ होता.अशावेळी जे म्हाता-याचं जुनं घर होतं.ते जुनं घर त्यांनी विकलं व मोठा बंगला बांधला.तसे ते तिथे राहायला गेले.


तो बंगला तिनं आयुष्यात कधी पाहिलेला नव्हता.अचानक तिला मिळाल्याबद्दल अभिमान वाढला.तो एवढा अभिमान वाढला की ती त्या बंगल्याला जास्त महत्व देवू लागली.तशी एक चारचाकी गाडीही दाराच्या पुढं उभी होती. तो बंगला जरी तिचा असला,तिनं मेहनतीनं बांधला असला,त्या बंगल्यावर त्या म्हाता-याचा अधिकार नसला तरी खरं पाहिल्यास तो पुर्ण बंगला त्या म्हाता-याचाच होता.कारण त्यानं जर मुलाला जन्मच दिला नसता आणि लहानाचं मोठं केलं नसतं तसेच शिकवलं नसतं आणि नोकरी लागली नसती त्याच्या मुलाला तर आज ती मिळाली नसती.याचाच अर्थ असा की तो बंगला तिचा नसून त्यावर त्या म्हाता-याचाही तेवढाच अधिकार होता.पण हे लक्षात कोण घेतंय.


आज असेच वातावरण बहुतेक घरात सुरु आहेत.जरी म्हाता-या मंडळींचं घर असलं, कितीही मालमत्ता असली तरी त्या घरातील स्नुषा ह्या म्हाता-या मंडळींसमोर अशाच वर्तनातून वागत असतात.हेच चित्र घराघरातून दिसून येते.हे चित्र जेव्हा त्या घरातील नातवंड पाहात असतात.तेव्हा मात्र खरंच विचार यायला लागतो की या लहान मुलांवर कोणते संस्कार होणार. ही मुले पुढे संस्कारी बनतील की नाही.


महत्वाचं म्हणजे शिक्षणातून संस्कार रुजायला हवं.तो संस्कार फुलायला हवं.मग ते संस्कार कुठूनही होवोत.या चांगल्या संस्कारासाठी शाळेचीच मर्यादा नाही.तर ते संस्कार घर,परीसर या ठिकाणाहूनही होतात. शाळा हे संस्काराचे माहेरघर आहेच.तेथून तर चांगले संस्कार होतातच.कारण ते संस्कार करण्याचेच केंद्र आहे.पण घरीही मायबापांनी कुसंस्कार होणार नाही याची काळजी घ्यावी.कारण शाळेमध्ये मुलगा पाचच तास असतो.तर दिवसाच्या चोवीस तासांपैकी एकोणवीस तास घरी किंवा परीसरात असतो.त्यामुळं परीसरातून नाही जमले तरी घरातून संस्कार होणे महत्वाचे आहे.त्याशिवाय आदर्श पिढी घडणार नाही. मात्र ते कसे करावेत याची काळजी प्रत्येक मायबापांनी नक्कीच घ्यायला हवी.नक्कीच घेतली पाहिजे.


-अंकुश शिंगाडे,

नागपूर ९३७३३५९४५०

 
  • वरील लेखात मांडलेल्या मतांशी "महान्यूज ऑनलाईन" सहमत असेलच असे नाही. "महान्यूज ऑनलाईन" या वेब पोर्टलवर प्रसिध्द / प्रकाशित केलेल्या साहित्यामुळे काही वाद-विवाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित लेखकाची असेल.

bottom of page