संस्कार भारतीची 'श्रीकृष्ण राधा रूप सज्जा स्पर्धा' उत्साहात संपन्न
श्रीकृष्ण हा प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. मित्र, सखा, मार्गदर्शक,पिता, पुत्र, आस्वादक, रसिक अशा विविध रूपात तो नेहमीच आपल्या अवती भवती असतो. त्याच्या बासरीचे सूर आपल्याला युगानुयुगे वेड लावत आहे. या मनमोहनाचे मोहक रूप बालगोपालांच्या माध्यमातून साकरण्याची संस्कार भारतीची ही स्पर्धा भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व दर्शविणारी असल्याचे प्रतिपादन गोपालकृष्ण मंदिर समितीचे सहसचिव राजेश्वर सुरावार यांनी केले.
संस्कार भारती चंद्रपूरच्या वतीने 31 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण राधा रूप सज्जा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गोपालकृष्ण मंदिरात ही स्पर्धा पार पडली.
ही स्पर्धा वयोगट 1 ते 5 आणि 6 ते 10 या दोन वयोगटात संपन्न झाली. दोन्ही गटात स्पर्धकांचा लक्षणीय प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. 'अ' गटात प्रथम -लिविष्का सपाटे, व्दितीय - माधव लाल, तृतीय -लावण्या बेलगे तर 'ब' गटात प्रथम - नमन राजा, व्दितीय -श्रिया सावे, तृतीय - श्राव्या बोकडे हे स्पर्धक विजेते ठरले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अक्षय लोणारे व रंगभूषाकार सौ रोहिणी जोगे यांनी केले.
यावेळी मंदिर समितीचे सचिव राजेंद्र राजदेरकर, राजेश्वर सुरावार, संस्कार भारतीचे जिल्हा सचिव मंगेश देऊरकर, अध्यक्ष सौ संध्या विरमलवार आदी उपस्थित होते. हाथी घोडा पालखी जय कन्हय्या लाल की च्या गजरात बालगोपालांनी स्पर्धेचा आनंद लुटला. यावेळी नृत्य विधेच्या सौ पूनम झा यांनी कृष्णगीतावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे संचालन सचिव लिलेश बरदाळकर यांनी केले. प्रास्ताविक सौ संध्या विरमलवार तर आभार प्रदर्शन कोष प्रमुख सुजित आकोटकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नीता उत्तरवार, जागृती फाटक, नूतन धवने, पूर्वा पुराणिक, दीपाली पाचपोर, स्वरा बरदाळकर, ओम बरदाळकर आदींनी परिश्रम घेतले.