top of page

संस्कार भारतीचा गुरुसन्मान सोहळा उत्साहात

चंद्रपूर : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रविवार, दि. 28 जुलै रोजी संस्कार भारतीच्या वतीने गुरुसन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रकार व रांगोळीकार प्रल्हाद ठक यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ नंदिनी देवईकर, संस्कार भारतीच्या अध्यक्षा सौ संध्या विरमलवार, जिल्हा मंत्री मंगेश देऊरकर, प्रांत कुटुंब आयाम प्रमुख भावना हस्तक, जागृती फाटक, अजय धवने, सौ पूनम झा, मंगेश देऊरकर डॉ राम भारत आदी उपस्थित होते.

" चित्रकार म्हणून मी समाजाशी जोडला गेलो. कलेच्या प्रचार प्रसारासोबत समाजाची सेवा देखील केली. महारांगोळी असो वा स्वरक्ताने काढलेली महापुरुषांची चित्रे असो जेव्हा जेव्हा कौतुक झाले, विक्रमाची नोंद झाली तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीची मला प्रकर्षाने आठवण झाली. संस्कार भारती ने माझा जो सन्मान केला तो माझ्या घरच्या व्यक्तींनी केलेला सन्मान आहे" अशी भावना ज्येष्ठ चित्रकार व रांगोळीकार प्रल्हाद ठक यांनी यावेळी व्यक्त केली. गुरुसन्मान सोहळयाचे प्रास्ताविक सौ संध्या विरमलवार यांनी तर आभार प्रदर्शन लिलेश बरदाळकर यांनी केले.

पाऊस गीतांचा कार्यक्रम ' ऋतू हिरवा '

गुरुसन्मान सोहळ्यानंतर ' ऋतू हिरवा ' हा पाऊस गीतांचा कार्यक्रम संस्कार भारतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सादर केला. प्राजक्ता उपरकर आणि पूनम झा यांच्या विद्यार्थीनींनी पावसावर आधारित नृत्य सादर केलीत. मंगेश देऊरकर, राम भारत, प्रणाली पांडे, भावना हस्तक, जागृती फाटक, क्षमा धर्मपुरिवार,अपर्णा घरोटे,स्वरूपा जोशी, दीपाली पाचपोर, नीता उत्तरवार यांच्या सह अनया भारत, अनिशा भारत, स्वरा बरदाळकर, आनंदी बरदाळकर, सोनाक्षी पिंगे, श्रीश जोशी, माही घुशे, अंतरा बरदाळकर, अन्वी श्रीपूरवार या बाल गायकांनी सहभाग घेतला. निवेदन पूर्वा पुराणिक यांनी केले. संगीत नियोजन प्रवीण ढगे यांनी केले. पियुष राजगडे, सोहन कामतकर,संदीप मंडल,लिलेश बरदाळकर यांनी वादक म्हणून साथ संगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजित आकोटकर, किरण पराते, सुहास दुधलकर यांनी परिश्रम घेतले.



bottom of page