top of page

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.

राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसेच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध होत असत. ‘बालगंधर्व’ला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.

गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. ससून रुग्णालयाच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वत: डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. सोबतच उपमुख्यमंत्री कार्यालय, आरोग्यमंत्री कार्यालय सातत्याने उपचाराबाबत विचारपूस करत होते. त्यानुसार डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.


bottom of page