top of page
Writer's pictureMahannewsonline

मद्यधुंद शिपायाची करामत; ग्रामस्थ जुलाब, उलट्यांनी हैराण!

दारूच्या नशेत ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावातील विहिरीत टीसीएल पावडरचे अख्खे पोते टाकले. यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो सदृश्य उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली.या बाधितांना वाई,पाचवड येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील सरताळे (ता. जावली) गावातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली.

सरताळे (ता.जावली) येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने मंगळवारी रात्री गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडर ऐवजी संपूर्ण पोतंच विहिरीमध्ये रिकामं केलं. बुधवारी सकाळी नियमितपणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. मात्र हे पाणी पिल्याने गावातील ५० पेक्षा जास्त ग्रामस्थांना सकाळी काही तासांनंतर जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. परंतु हळूहळू त्याचे प्रमाण वाढले. सरपंचासह सरताळे ग्रामपंचायतीतील सदस्यास देखील दूषित पाणी पिल्याने बाधा झाली आहे. एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अखेर आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी केली असता दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

प्रत्येक घराची तपासणी

गॅस्ट्रोसदृश प्रकारामुळे आरोग्य विभागाने तत्काळ तपासणी मोहीम हाती घेतली. आधी विहिरीतील सर्व पाणी उपसा करून काढण्यात आले. त्यानंतर प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्यात आली. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल, तसेच झालेल्या प्रकारची सखोल चौकशी करून ग्रामपंचायतीच्या शिपायावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांनी सांगितले.


bottom of page