top of page
Writer's pictureMahannewsonline

वीजबिल वसुली तिथे ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम; वीज समस्यांचा निपटारा करण्यास प्राधान्य

वीजबिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन

सातारा– रब्बीचा हंगाम सुरु झाला असून, शेतीपंपाच्या वीज मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तशा विजेच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने पुन्हा एकदा ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम हाती घेतला असून, ज्या गावांत वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले आहे अशाच गावांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम राबवून तेथील सर्व वीजसमस्या दूर करण्याचा प्रयत्न महावितरण करत आहे. बारामती परिमंडलात आतापर्यंत ६३७ गावांत हा उपक्रम राबविला आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतील ‘एक गाव, एक दिवस’ हा उपक्रम वीज समस्यांवर रामबाण उपाय ठरल्याने महावितरणतर्फे संपूर्ण राज्यात तो राबविला जात आहे. या उपक्रमासाठी गावाची निवड करताना सर्वप्रथम त्या गावातून होणाऱ्या वसुलीचा विचार होतो. त्यापाठोपाठ इतर निकष लावून गावात महावितरणची संपूर्ण यंत्रणा एकाच दिवशी जाते. जाताना पुरेशे मनुष्यबळ, साधनसामुग्री सोबत असते. यामध्ये विजेचे खांब, तारा, स्टे, किटकॅट, रोहित्राचे ऑईल इत्यादींचा समावेश आहे. तर वीजबिलाच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी लेखा विभागाचे कर्मचारीही सोबत असतात. एकुणच गावातील नागरिकांच्या विजेबाबतच्या सर्व समस्या निवारण्याचे काम या उपक्रमात केले जाते. त्याचा फायदा पुढे वसुलीला होतो.

गावातील झुकलेले, मोडलेले खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्याने मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरण पेटीची देखभाल दुरुस्तीची कामे करणे, अनाधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे तसेच नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जातात. तर वीजबिलातील त्रूटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याने अनेक गावांतून या उपक्रमासाठी आग्रह धरला जातो. आतापर्यंत बारामती मंडलात १७९, सोलापूर २४० तर सातारा मंडलातील २१८ गावांत हा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे.

ग्राहकांना अखंडित वीज पुरविणे महावितरणचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांनीही वापरलेल्या विजेचे वीजबिल वेळेत भरणे त्यांचे कर्तव्यच आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासोबतच अनेक ऑनलाईन पर्याय दिले आहे. नवीन नियमांनुसार १ नोव्हेंबरपासून एका महिन्यात ५ हजारांहून अधिकचे वीजबिल रोखीने स्विकारता येत नाही. त्यामुळे ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, गुगल पे, फोन पे आदी युपीआय ॲपचा वापर करुन दरमहाचे वीजबिल भरावे. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करुन सुद्धा सहजपणे व घरबसल्या वीजबिल भरता येते.


वीजबिल भरा, कारवाई टाळा- सुनील पावडे
महावितरणची आर्थिक स्थिती नाजूक असून, ग्राहकांकडून वीजबिल वसूल झाल्याशिवाय वीज खरेदी, विजेचे वितरण अगदी कर्मचाऱ्यांचा पगार करणेही मुश्किल बनले आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीची कठोर मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेत भरुन कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी केले आहे.


bottom of page