top of page
Writer's pictureMahannewsonline

जगाला गुड बाय करण्याची वेळ आली... ; सचिन वाझेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनं खळबळ

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते.

काय आहे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस?

“3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. त्या प्रकरणात आत्तापर्यंत काहीच निष्पन्न झालं नाही. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत, असं सचिन वाझेंनी म्हटलं आहे. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.


मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे हे मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या मृत्यू प्रकरणामागे वाझे असल्याचा दावा फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती.


मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली. वाझे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसली तरी या प्रकरणात अटकेची भीतीने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

bottom of page