top of page

... अन् आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, VIDEO पाहाच

Updated: Aug 16, 2022

कामगारांना खराब अन्न दिल्याने संतोष बांगर आक्रमक

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आहेत. "जो आपल्याला गद्दार म्हणेल, त्याच्या कानाखाली जाळ काढावा', अशा आशयाचं विधानही बांगर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यानंतर संतोष बांगर आज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याने बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

राज्य सरकारने कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत कामगारांना दुपारचं जेवण पुरवलं जातं. या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारचं जेवण द्यायला हवं? याची यादीही सरकारने ठरवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला आज बांगर यांनी भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. उपहारगृहात जाऊन कामगारांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची पाहाणी केली. यावेळी कामगारांना पुरवलं जाणारं निकृष्ट दर्जाचं जेवण पाहून बांगर यांना राग अनावर झाला. त्यांनी उपस्थित असलेल्या उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला जाब विचारला, पण व्यवस्थापक काहीही उत्तरं देऊ शकला नाही, त्यामुळे बांगर यांनी व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे.


तसेच ज्या कंत्राटदाराला मध्यान्ह भोजन पुरवण्याचं कंत्राट दिलं आहे, त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं, अशी मागणी बांगर यांनी केली. कंत्राटदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास एकही कर्मचारी इथे राहू देणार नाही, असा इशाराही बांगर यांनी दिला आहे



bottom of page