top of page
Writer's pictureMahannewsonline

तर दक्षिण तालुका महिला सक्षमीकरणात आदर्श मॉडेल ठरेल: आ. सुभाष देशमुख

भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संघटित होऊन ग्रामपंचायत पातळीपासून भाजपा पक्ष मजबूत करण्याचे काम करावे, महिलांनी धाडसाने पुढे येऊन काम केल्यास दक्षिण सोलापूर तालुका महिला सक्षमीकरणात अवघ्या राज्यात आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूर महिला आघाडीची बैठक सोमवारी होटगी रस्त्यावरील विकास नगर येथील आ. सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, दक्षिण सोलापूरचे भाजपा तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, महिला तालुकाध्यक्षा दीपाली व्हनमाने, उपाध्यक्षा अंबिका पाटील, एम.डी. कमळे, तालुका सरचिटणीस अप्पासाहेब मोटे, यतीन शहा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


आ. देशमुख म्हणाले की, महिलांनी प्रथम स्वतः साक्षर होऊन संपूर्ण कुटुंबाला साक्षर करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. जोपर्यंत महिला स्वतः साक्षर होऊन सक्षम होत नाहीत तोपर्यंत कुटुंब सक्षम होणार नाही. स्त्रियांमध्ये जन्मत:च कल्पकशक्ती, मेहनत आणि सहनशक्ती पुरुषांच्या तुलनेने अधिक असते. याचा वापर करीत तालुक्यातील महिलांनी उद्योग, स्वयं-रोजगार, व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत ज्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील. याशिवाय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दक्षिण तालुक्यात शक्ती केंद्रप्रमुख - बुथप्रमुख आणि पन्ना प्रमुख अशी यंत्रणा राबवून तालुका भाजपामय करण्याबरोबरच महिलामय करावा.

दरम्यान, बैठकीत महिलांनी गाव पातळीवर उद्योग, व्यवसाय करताना येणार्‍या विविध अडचणी आणि नागरी समस्यांबाबत आ. देशमुख यांच्याशी चर्चा केली. यानंतर भाजपा दक्षिण सोलापूर तालुका महिला आघाडीच्या नूतन कार्यकारिणीची निवड होऊन, मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र देण्यात आले. स्वागत सुजाता सुतार यांनी तर आभार प्रदर्शन तब्बू नगारे यांनी केले. बैठकीस दक्षिण सोलापूर तालुक्यातील महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


bottom of page