top of page
Writer's pictureMahannewsonline

गाव समृद्ध होण्यासाठी कुटुंबे समृद्ध झाली पाहिजेत- आ.सुभाष देशमुख

सोलापूर : तांडा समृद्ध व्हायचा असेल तर आधी कुटुंबे समृद्ध झाली पाहिजेत आणि उद्योजकतेतूनच कुटुंबे समृद्ध होतील असे मत आमदार सुभाषबापू देशमुख यांनी काल उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिर्‍हे तांड्यावरच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्‍त केले. समृद्ध गाव योजनेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तिर्‍हे ग्रामस्थ आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या वतिने बाल दिन आणि समृद्ध तांडा अभियानाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत वरिष्ठ शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

तिर्‍हे तांड्यावरील नैसर्गिक तलावाच्या परिसरात वृक्षारोपण करून ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले आणि जाहीर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमात सायक्लीस्ट फाऊंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते आणि त्यासाठी ते सोलापूरहून सायकलींवर आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नौदलातील अधिकारी ले. कमांडर मनोज गुप्‍ता, सायक्लीस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग तारे, फाऊंडेशनच्या संचालक मयुरी वाघमारे-शिवगुंडे हे उपस्थित होते. बाल दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमातच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अवांतर वाचनाची पुस्तके वाटण्यात आली. तसेच असंघटित कामगारांना इ. श्रम कार्डांचे वाटप करण्यात आले.

लोकमंगल जीवक हॉस्पिटलच्या सहकार्याने या वेळी मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात येऊन 50 जणांची मोफत तपासणी करण्यात आली तर 70 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. या वेळी घेतलेल्या रक्‍तदान शिबिरात 21 जणांनी स्वेच्छा रक्‍तदान केले. या कामात लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले. लोकमंगल जीवक हॉस्पिटलचे डॉ. नितीन बाबर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच रुग्णांना गोळ्या आणि औषधांचे वाटप करण्यात आलेे. रक्‍तदानाची यंत्रणा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने उभी केली होती.

या वेळी मार्गदर्शन करताना आमदार सुभाषबापू देशमुख यांनी, कुटुंबे समृद्ध होण्यासाठी लहान सहान उद्योग सुरू करण्याची कल्पना मांडली. तांडयावरील महिलांचे पाक कौशल्य आणि ऑक्सिजन पार्क यांचा वापर करून तिर्‍हे तांड्याला एक चांगला पिकनिक स्पॉट बनवता येऊ शकेल, त्याला आपण मदत करू असे आश्‍वासन त्यांनी दिले.या कार्यक्रमाला सोशल फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, सुनील पवार, राम जाधव, भारत जाधव, विशाल जाधव, होटगीचे अतुल गायकवाड, व तिऱ्हे तांडा ग्रामस्थ, सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.


bottom of page