top of page
Writer's pictureMahannewsonline

पद नाही म्हणून नाराज होऊ नये; भाजपमध्ये निष्ठावंतांना संधी मिळतेचः आ. देशमुख

सोलापूर : पद नाही म्हणून नाराज न होता युवकांनी जोमाने कार्य करावे. भाजपमध्ये काम करणार्‍या प्रत्येकाला संधी मिळत असते, निष्ठावंतांची कदर भाजपमध्ये नक्की होते, त्याच जोरावर आज पक्ष मोठा झाला आहे, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा आ.सुभाष देशमुख यांनी केले. दक्षिण सोलापूर भाजपा युवा मोर्चाची बैठक आज विकास नगर येथील कार्यालयात पार पडली, त्या बैठकीत आ. देशमुख बोलत होते. यावेळी भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांना नियक्तीपत्र देण्यात आले.

पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले की, भाजपही कार्यकर्त्याची पार्टी आहे. येथे सामान्यांना संधी दिली जाते. त्यामुळे प्रत्येकांनी जोमाने काम करावे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे तालुक्याचे भविष्य आहेत, कार्यकर्त्यांनी आणखी झोकून देऊन कार्य केल्यास तालुक्याचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल. पद नाही म्हणून नाराज होऊ नये. निष्ठावंतांची कदर भाजपमध्ये नक्की होते, असेही देशमुख म्हणाले.

सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात आहे. यात शेतकर्‍याचे मोठे नुकसान होत असून यासाठी चळवळ उभी करुन प्रस्थापितांना बाजूला केले पाहिजे. शेतकरी व जनतेची प्रश्‍न मार्गी लागायचे असल्यास सोसायटीसह स्थानिक स्तरावर सत्ता केंद्रे ताब्यात हवीत, यासाठी तरुणांनी संघर्ष करायला हवे असेही आ. देशमुख म्हणाले.

सर्वप्रथम थोर समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी यांनी येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकावून तालुका भाजपमय करण्याची जबाबदारी आता युवा मोर्चाची असल्याचे सांगितले. यावेळी सिद्धाराम हेले, मळसिद्ध मुगळे, अंबिका पाटील, पंडित कोरे यांच्याबरोबरच युवा मोर्चाच्या नवनियुक्त काही पदाधिकार्‍यांचेही भाषणे झाली. आ. सुभाष देशमुख, तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी व युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप टेळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रामाप्पा चिवडाशेट्टी, जि. प. पक्षनेते अण्णाराव बाराचारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप टेळे, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, अंबिका पाटील, अनु. जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे, सिद्धाराम हेले, पंडित कोरे, जगन्नाथ गायकवाड, अप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुडले, धीरज छपेकर, अतुल गायकवाड, लक्ष्मण हक्के, दिपाली व्हनमाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार सरचिटणीस अप्पासाहेब मोटे यांनी मानले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


bottom of page