top of page
Writer's pictureMahannewsonline

दैव बलवत्तर! सेल्फीच्या नादात तरुण ६०० फूट दरीत कोसळला; २५ तासांनंतर रेस्क्यु टीमनं वाचवला जीव!

सातारा :मोबाईलने सेल्फी काढण्याचा मोह लहानांपासून थोरा-​मोठ्यांना होतो. या मोहापायी अनेक दुर्घटनाही झाल्या आहेत, अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशीच दुर्घटना साताऱ्यातील कास पठार परिसरात घडली. कास पठार परिसरात असलेल्या गणेशखिंड येथे सेल्फी काढण्याच्या नादात २२ वर्षीय तरुण ६०० फूट दरीत कोसळला.परंतु त्या तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने इतक्या खोल दरीत पडूनही तो वाचला. तब्बल २५ तासानंतर त्या तरुणाला दरीतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे.

साताऱ्याच्या यादोगोपाळ परिसरात राहणारा २२ वर्षीय कनिष्क सचिन जांगळे गुरुवारी संध्याकाळी कास पठारावर फिरण्यासाठी गेला होता. पण शुक्रवारी सकाळपर्यंत देखील तो परत न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली होती. त्याची मोटारसायकल गणेशखिंड परिसरातील मंदिराजवळ सापडल्यामुळे कुटुंबियांना संशय आला. त्यांनी अजून पुढे जाऊन पाहिल्यानंतर दरीत सुमारे ६०० फुटांवर कुणीतरी पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने पावलं उचलत शिवेंद्रसिंह राजे रेस्क्यु टीमला पाचारण केलं.


शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास रेस्क्यु टीमने दरीत पडलेल्या कनिष्कला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. टीममधील एक तरुण खोल दरीत उतरला. तो कनिष्कपर्यंत पोहोचला तेव्हा कनिष्क जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. क्रेनच्या सहाय्याने कनिष्कला वर आणण्यात आलं. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरु होते. तब्बल २५ तास हा तरुण जखमी अवस्थेत दरीमध्ये होता. कनिष्क शुद्धीवर आल्यानंतर सगळा प्रकार समोर स्पष्ट आला. गुरुवारी संध्याकाळी साधारणपणे ६ वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड परिसरात दरीच्या टोकावर उभं राहून सेल्फी काढताना कनिष्कचा पाय घसरला आणि तो दरीत थेट ६०० फूट खोलपर्यंत जाऊन पडला.


कनिष्कला बाहेर काढताच पोलिसांनी कनिष्कला रुग्णालयात दाखल केलं. या बचाव कार्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे विक्रम पवार (पापा), चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ व अभिजित शेलार यांचा सहभाग होता.



bottom of page