top of page

सेल्फीने घेतला जीव; तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

सेल्फी काढण्यासाठी अनेकजण आपला जीवही धोक्यात घालतात. सेल्फी काढत असताना अनेक दुर्घटनाही झाल्या आहेत. परंतु सेल्फीची क्रेझ काही कमी होईना. झारखंडमधील सिंगभूम जिल्ह्यात अशीच एक दुर्घटनाघडली आहे. मित्रांसोबत नदीकाठी सेल्फी काढण्याच्या नादात एका १६ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आलं आहे.

विक्रांत सोनी असं मृत १६ वर्षीय तरुणाचे नाव असून तो आपला भाऊ आणि ४ मित्रांसोबत खारखाई नदीच्या बागबेरा बडोदा घाटावर गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना पाय घसरुन तो नदीत पडला. विक्रांत नदीत पडल्यानंतर त्याचे मित्र घाबरले आणि पळून गेले. मात्र त्याचा भाऊ त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने विक्रांतचा भाऊदेखील नदीत बुडू लागला होता. पण स्थानिकांनी धाव घेत त्याला वाचवलं असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या प्रकरणाची माहिती घेत डायव्हरच्या मदतीने विक्रांतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरा विक्रांतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. काही दिवसांपूर्वी विक्रांत दहावी उत्तीर्ण झाला होता, त्याचे वडील एलबीएसएम कॉलेजमध्ये त्याला पहिल्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी गेले होते.


bottom of page