top of page
Writer's pictureMahannewsonline

अमरावतीच्या श्वेताचे धाडस; अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना मायदेशी आणण्यात बजावली महत्वाची भूमिका

अमरावती : अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळविल्यानंतर देश सोडण्यासाठी अनेक नागरिकांनी विमानतळाकडे धाव घेतली. अनेकांनी विमानावर लटकून प्रवास करण्याचाही प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ देखील समोर आले. तसेच याठिकाणी गोळीबार देखील झाला होता. इतकी भयंकर परिस्थिती असतानाही अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता चंद्रकांत शंके हीने जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत १२९ भारतीयांना अफगाणिस्तानातून मायदेशी सुखरुप आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावासातील कर्मचारी व भारतीय नागरिक अडकले होते. आपल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने एअर इंडियाचे विमान अफगाणिस्तानमध्ये पाठविलं. एअर इंडियाचं विमान अफगाणिस्तानमध्ये पोहोचलं असताना विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरुप परत देखील घेऊन आलं. एअर इंडियाच्या या विमानातील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील श्वेता शंकेचा देखील समावेश आहे. ए आय-२४४ या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत १२९ भारतीयांना मायदेशी आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.

दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताच्या या धाडसाचे कौतुक केलं आहे. ठाकूर यांनी फोन करुन श्वेतासोबत सवांद साधला. काही लागलं तर हक्कानं फोन कर, असं सांगून यशोमती ठाकूर यांनी श्वेताचं कौतुक केलं आहे. काबूल येथील परिस्थिती अतिशय गंभीर असून जेव्हा इंडियन एअरलाइन्स विमान लँड झालं त्यावेळी गोळीबाराचे आवाज येत होते, असं श्वेतानं यशोमती ठाकूर यांना सांगितलं.


bottom of page