top of page
Writer's pictureMahannewsonline

सोलापुरात अंत्ययात्रेला शेकडोंची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने जमले नागरिक

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते आणि मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. त्यानंतर रविवारी म्हेत्रेंच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक जमले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन असतानाही शेकडोंच्या संख्येने गर्दी जमली. यावेळी अनेकांनी मास्क लावले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.


करण म्हेत्रे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कार्यकर्ते संबंधित हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी सोलापुरात म्हेत्रेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजताच त्यांच्या अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.


करण म्हेत्रे हे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सोलापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांचं वजन होतं. गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण म्हेत्रे यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ताडीच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी स्वखर्चाने जिमही बांधली होती. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी करण म्हेत्रे यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.



bottom of page