top of page
Writer's pictureMahannewsonline

सोलापूर विद्यापीठातील सहा प्राध्यापकांना जागतिक मानांकन

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती


सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहा संशोधक प्राध्यापकांना जागतिक ए. डी. सायंटिफिक इंडेक्स या संशोधन यादीत मानांकन प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.


अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. त्यात जगातील 181 देशातील 10655 विद्यापीठातून 565533 संशोधकामधून निवड करून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. रघुनाथ भोसले, डॉ. मुकुंद माळी, डॉ. सदानंद शृंगारे, भौतिकशास्त्र संकुलातील डॉ. उजमा बांगी, शास्त्रीय उपकरण केंद्रातील डॉ. मकरंद कुलकर्णी आणि जैवविज्ञान संकुलातील डॉ. श्रीपाद सुरवसे या सहा प्राध्यापकांना जागतिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्यांनी केलेल्या संशोधन कार्याची दखल घेऊन जागतिक संशोधन क्रमवारीत त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.


ही संशोधन क्रमवारी गुगल स्कॉलरमधील संशोधकांच्या अद्यावत माहिती वरून तयार केली आहे. त्यामध्ये संशोधकांचे नाव, विद्यापीठाचे नाव, देशाचे नाव तसेच एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स व सायटेशनचा समावेश आहे. या माहितीवरून संशोधकांची जागतिक, राष्ट्रीय व विद्यापीठातील क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहा संशोधक प्राध्यापकांची या जागतिक क्रमवारीत समावेश झाल्याने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. यामुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा व प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनीही प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

bottom of page