top of page
Writer's pictureMahannewsonline

पडिक, नापिक जमिनीतून मिळणार दरवर्षी प्रतिएकर 30 हजारांचे उत्पन्न

महावितरणच्या सौर कृषी वाहिनी योजनेतून संधी

पुणे : राज्य शासनाच्या सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे शेतीसाठी कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाटी 2 ते 10 मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांसाठी महावितरणकडून 3 ते 50 एकरांपर्यंत जागा भाडेतत्वावर घेण्यात येत असून जमीनधारकांना प्रतिएकर 30 हजार रुपये वार्षिक भाडे व त्यात दरवर्षी 3 टक्के वाढ देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह खासगी जमीनधारक किंवा समुह तसेच सहकारी संस्था, साखर कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था आदींना निश्चित वार्षिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे प्रादेशिक विभागात या प्रकल्पांसाठी आतापर्यंत 55 अर्जांद्वारे 839 एकर जमिनींचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषीपंप विज धोरण 2020 मध्ये कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, सहकारी संस्था, साखर कारखाने, जलउपसा केंद्र तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध संस्था, कंपन्या, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, प्रशासकीय संस्था, नागरी व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे (महसूल विभागाच्या मालकीची व ताब्यातील जमीन वगळून) आदींच्या मालकीच्या जमीनी 27 ते 30 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणकडून प्रतिएकर 30 हजार रुपये वार्षिक भाडेपट्टी व दरवर्षी 3 टक्के वाढ देण्यात येणार आहे. या सर्वांनी जमिनी भाडेपट्टीवर देण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

महावितरणच्या 33/11 केव्ही उपकेंद्रांच्या 5 किलोमीटर परिघातील जमिनी घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच महसूल विभागाच्या मालकीच्या व ताब्यातील जागा नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर 30 वर्षांसाठी अधीग्रहीत करण्यात येणार आहे. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी पुणे जिल्हा- 286, कोल्हापूर- 129, सांगली-140, सातारा- 81 आणि सोलापूर जिल्ह्यातील 261 अशा एकूण 897 उपकेंद्रांची यादी जाहीर केली आहे. या उपकेंद्रांची यादी, योजनेची संपूर्ण माहिती, अर्ज व इतर प्रक्रियेची सोय https://mahadiscom.in/solar-mskvy/index_mr.html या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. आतापर्यंत या प्रकल्पांसाठी पुणे प्रादेशिक विभागात 55 अर्जांद्वारे 839 एकर जमिनीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात सोलापूर जिल्हा- 34 अर्जांद्वारे 434 एकर, कोल्हापूर- 4 अर्जांद्वारे 161 एकर, सातारा- 4 अर्जांद्वारे 107 एकर, पुणे जिल्ह्यातून 10 अर्जांद्वारे 87 एकर जमिनीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांवर महावितरणकडून कार्यवाही सुरु आहे.


सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी भाडेपट्टीवरील जमीन ही क्लिअर टायटलची तसेच अतिक्रमणमुक्त, तारणमुक्त व कर्जमुक्त तसेच कोणत्याही संस्थेची बोजामुक्त असणे आवश्यक आहे. जमीन मालकांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यास त्यांच्यापैकी एका व्यक्तीस नामनिर्देशित करून अधिकार पत्र द्यावे लागेल. अर्जदार किंवा अधिकार प्राप्त प्रतिनिधीने दोन महिन्यांच्या आतील अद्यावत सातबारा, आठ अ व फेरफार उताऱ्याच्या मूळ प्रती अर्ज दाखल करताना अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने दहा हजार रुपये अधिक 18 टक्के जीएसटी प्रक्रिया शुल्क भरणे देखील आवश्यक आहे. शेतीच्या सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी अतिशय महत्वाच्या सौर कृषी वाहिनी योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरु आहे.


bottom of page