top of page
Writer's pictureMahannewsonline

पवारांनी केलं गडकरींच्या कामाचं कौतुक; रस्त्याने प्रवास करण्याचं कारण ही सांगितलं

अहमदनगर: जिल्ह्यातील महामार्गांचं भूमिपूजन व लोकार्पणाचा सोहळा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज झाला. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं. यावेळी गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलं.

यावेळी बोलताना शरद पवारांनी रस्त्यांचं देशाच्या विकासातील महत्व सांगितलं. रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत असल्याचं सांगितलं. “देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो”, असं ते म्हणाले.


गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात, असं ही त्यांनी यावेळी सांगितले


bottom of page