top of page
Writer's pictureMahannewsonline

शरद पवारांनी बोलावली भाजपाविरोधी पक्षांची बैठक

'राष्ट्रमंच'च्या बॅनरखाली एकत्र येण्यावर होणार चर्चा ?

नवी दिल्ली: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच शरद पवार यांनी उद्या मंगळवारी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शरद पवारांनी उद्या विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून या बैठकीला 15 राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीत राष्ट्रमंचच्या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणं सोपं जाईल, असं काही नेत्यांचं मत असल्याने राष्टमंच नावानं नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे विरोधकांच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत रोखण्यासाठी रणनिती आखली जात असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही २४ जूनला काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे.


bottom of page