top of page
Writer's pictureMahannewsonline

भर सभागृहात नगरसचिवांच्या दिशेने बाटली भिरकावली; भाजप नगरसेवक निलंबित

सोलापूर : भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी नगरसचिवांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी ( दि,२६ ) घडला. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सुरेश पाटलांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. आपल्याच पक्षाच्या नगरसेवकावर कारवाई करण्याची नामुष्की महापौरांवर ओढवली.

शुक्रवारी मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा महापौर श्रीकांचन यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेला सुरुवात होताच नगरसचिव रवींद्र दंतकाळे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात केली. या दरम्यान विविध बाबींवर नगरसेवक सुरेश पाटील यांनी महापौरांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत अनेक विषयांमध्ये त्यांना बोलण्याची संधी न देता विषय पत्रिकेवरील विषय मंजुरी देत पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. यावर संतापून सुरेश पाटील यांनी आपल्या बाकावरील पाण्याची बाटली नगरसचिवांच्या दिशेने फेकून गोंधळ सुरू केला.

स्वपक्षीय नगरसेवकाची ही कृती सभागृहाच्या संकेताला बाधा आणणारी असल्याचे लक्षात येताच महापौरांनी सुरेश पाटील यांना सभागृहातून बाहेर काढण्याचा सूचना केल्या. महापौरांच्या दिशेने बाटली फेकणे किंवा सभागृहात असंसदीय वर्तन करणे हे निंदनीय असल्याचे सांगत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.


bottom of page