top of page
Writer's pictureMahannewsonline

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. याचबरोबर, लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच, प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल)परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. अशी देखील त्यांनी माहिती दिली.

कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो. परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येणार आहे.

bottom of page