top of page
Writer's pictureMahannewsonline

दहावी-बारावीच्या मुलांना सरसकट पास करणार?

परीक्षा रद्द करण्यासाठी इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशनची पंतप्रधान मोदींना विनंती

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करावे, अशी मागणी आता पालक संघटनांकडून करण्यात आली असून पालक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देतील का? हे पाहावे लागेल.


इंडिया वाईड पॅरेंटस असोसिएशनने पंतप्रधान मोदींना हे पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारने कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दहावी आणि बारावीसह विद्यापीठांच्या परीक्षा या अंतर्गत मूल्यमापन करुन विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण जाहीर करावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे,


कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिलच्या अखेरीस सुरु होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. या परीक्षा रद्द झाल्या नाही तर किमान ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले होते.

bottom of page