top of page
Writer's pictureMahannewsonline

अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलीने केली आईची हत्या

Updated: Aug 11, 2021

मुंबई : आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने एका अल्पवयीन मुलीने कराटे बेल्टने आपल्या आईचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आईची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी सदर मुलीने बेडरुमचा दरवाजा आतुन बंद करुन, आईच्या मोबाईल फोनवरुन आपल्या नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचे देखील तपासात आढळून आले आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव असे असून ती ऐरोली सेक्टर-7 मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव , १५ वर्षीय मुलगी व ६ वर्षाचा मुलगा यांच्यासह राहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी शिल्पा जाधव व संतोष जाधव या दोघांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला गत मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला होता. मुलीचे आपल्या आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुलीने आईविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावलं होतं. पोलिसांनी मुलीची व तिच्या आई-वडीलांची समजूत काढून त्यांना घरी पाठवुन दिले होते.

३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरुन दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. यावेळी मुलीने आईला धक्का दिला, त्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर सदरचा प्रकार हा आत्महत्येचा वाटावा यासाठी मुलीने बनाव केला. त्यानंतर या मुलीने आपल्या वडीलांना फोन करुन आई बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या मुलीच्या वडीलांनी जवळच राहणारा आपला मेव्हणा शैलेश पवार याला सांगितल्यानंतर त्याने तत्काळ बहिणीच्या घरी धाव घेऊन बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये त्याला बहिण मृतावस्थेत पडल्याचे व तीच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे निदर्शनास आले.


या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैला जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनात शैला जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मुलीवर हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


bottom of page