top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार

परीक्षा संचालक श्रेणीक शाह यांची माहिती

सोलापूर- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी दिली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले. यानुसार आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे.


यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. 26 एप्रिल 2021 पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे. तर फार्मसी व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या सत्र एक ते चारच्या परीक्षा 5 मे 2021 पासून सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे.


ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही 50 गुणांची असेल. त्यानुसार विद्यापीठ परीक्षा विभागाकडून रचना करण्यात येत आहे. अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे परीक्षा संचालक सीए शाह यांनी सांगितले.


bottom of page