महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday 23 December 2024
.mahanewsonline.com
भाजपा नेत्यांना गावात प्रवेशबंदी
कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आज ७० वा दिवस. अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर हरयाणामधील चरखी दादरी जिल्ह्यातील एका गावात थेट राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा आणि जननायक जनता पार्टीच्या (जजपा) नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. समसपूर गावामध्ये भाजपा आणि जजपाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करु नये अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली असून गावकऱ्यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेशबंदी आहे असं सांगणारे बोर्डही गावाच्या वेशीवर लावले आहेत.
काही दिवसांपूर्वी फोगट खाप १९ पंचायतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांनी भाजपा आणि जजपाच्या नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आता गावाच्या वेशीवर भाजपा आणि जजपाच्या नेत्यांना प्रवेशबंदी आहे असं सांगणार बोर्ड लावला आहे. दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने गावात प्रवेश केला तर त्याची जाहीर मिरवणूक काढण्यात येईल असंही गावकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जो शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे त्याच पक्षाला गावात प्रवेश दिला जाईल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणत केंद्राने जे तीन कायदे लागू केले आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाहीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कायदे मान्य करता येणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. आम्ही या दोन पक्षाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे त्याप्रमाणे इतर गावातील नागरिकांनाही या पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश देऊ नये असं आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.