top of page
Writer's pictureMahannewsonline

शेतकऱ्याचा धाडसी निर्णय; मुलीचं अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : जिल्ह्यातील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी एका शेतकऱ्याने उभ्या ऊसाच्या फडालाच आग लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. बाबासाहेब दुबिले असं या शेतकऱ्याचं नाव आहे, ऊसाचा फड पेटविण्यात आल्यानंतर आरोपी उसातून बाहेर आला. तो बाहेर येताच उसतोड कामगारांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. विष्णू उत्तम गायकवाड असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवपूर गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी पहाटे एकच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांची तीन कुटुंबे बैलगाडीने मुक्तेश्वर साखर कारखाना (गंगापूर) येथून वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपूर याठिकाणी आली होती. संबंधित ऊस तोडणी कामगार पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेब दुबिले यांच्या शेतात पोहोचले होते. यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या सहा आणि दहा वर्षांच्या दोन मुलींना बैलगाडीत झोपवून उसतोडणीच्या कामाला लागले होते. दरम्यान साडे तीनच्या सुमारास त्यांना आपल्या मुलींच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी बैलगाडीच्या दिशेनं धाव घेतली. एका अज्ञात व्यक्तीने लहान बहिणीला उचलून उसाच्या शेतात गेल्याची माहिती मोठ्या मुलीने दिली.

त्यानंतर कामगारांनी अपहरण करणाऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अंधार असल्यानं आरोपीला पकडणं कठीण झालं. यावेळी प्रसंगावधान दाखवत शेतकरी बाबासाहेब दुबिले यांनी एक एकर ऊस पेटवून दिला. उसाला आग लागल्यानंतर आरोपी उसातून बाहेर आला. यावेळी कामगारांनी आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुटका केली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेचा पुढील तपास वाळूज पोलीस करत आहेत.


bottom of page