top of page
Writer's pictureMahannewsonline

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

उद्योजक घडवणे हा शिक्षणाचा उद्देश हवा: डॉ. जी. तिरुवसगम

सोलापूर -भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिक्षणाचा हेतू नोकरदार घडविणे हा होता. मात्र आताच्या काळात उद्योजक घडवणे आणि त्यापेक्षाही पुढे जाऊन उत्कृष्टता निर्माण करणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे, त्यादृष्टीने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल तिरुवसगम यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने अरण्यऋषी श्री मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व अन्य.


रविवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी नऊ वाजता कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

यावेळी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख 51 हजार रुपये, सन्मान चिन्ह, गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या समारंभास भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल डॉ. जी. तिरुवसगम यांची ऑनलाइन प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते. प्र कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले. प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. डॉ. विकास पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. शिवाजी शिंदे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. या कार्यक्रमाचे युट्युबवर थेट प्रक्षेपण झाले.

डॉ. तिरुवसगम पुढे म्हणाले, केवळ एक-दोन महान व्यक्ती निर्माण करून कधी देशाचा विकास होत नसतो, असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम म्हणत असत. त्यानुसार देशाचा विकास होण्यासाठी विद्यापीठांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जीवनात स्तर उंचावण्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतात खूप महत्त्वपूर्ण कामगिरी केली आणि इतिहास घडवला. त्या अहिल्यादेवींचे नाव या विद्यापीठाला लाभले आहे. या विद्यापीठाने ते लक्षात ठेवून देशाच्या विकासात योगदान द्यायला हवे, अशी अपेक्षाही कर्नल तिरुवसगम यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शिक्षण, संशोधन या क्षेत्रात चांगली प्रगती केली असून हे विद्यापीठ आता देशस्तरावर नावारूपाला आलेले आहे, असे कौतुक करून कर्नल तिरुवसगम म्हणाले की, सध्याच्या काळात नवे शैक्षणिक धोरण आलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपणाला भारतीय दृष्टीकोनातून शिक्षण देण्याची व विद्यार्थी घडविण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानदेखील बदलते आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाच्या मदतीने आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी प्रगती करून देशाच्या विकासाला हातभार लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर समाजकार्य केल्याने त्यांना देवी ही पदवी दिली, ही फार महनीय बाब आहे. महाराष्ट्रातील सर्व नद्यांवर त्यांनी घाट बांधले, घाट हा अलंकार असतो. त्याचबरोबर विहिरीवर दिवा ठेवण्यास देखील कोनारे बांधले, ती फार अद्भुत गोष्ट आहे. अशा या अहिल्यादेवी होळकर यांचे नावे असलेल्या विद्यापीठात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. माळढोकच्या नान्नज अभयारण्यात नर-मादीच्या जोड्या असल्याशिवाय पक्षांची संख्या वाढणार नाही. त्याचबरोबर किमान दहा ते पंधरा नर-मादी येथे असणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, आपले विद्यापीठ सध्या महाराष्ट्रात चांगली कामगिरी करते आहे. या विद्यापीठातील, शिक्षक अधिकारी, अधिकार मंडळाचे सदस्य या सर्वांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. विद्यापीठ समान प्रगती करते आहे. या विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करावे, त्यामुळेच शिक्षण व्यवस्था ही यशस्वी होऊ शकेल. नोकरीच्या मागे लागणारे विद्यार्थी न घडवता इतरांना नोकरी देणारे उद्योजक शिक्षकांनी घडवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालय आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण देताना किमान सहा महिने तरी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम त्यांना देण्याचा विचार सर्वांनी करायला हवा. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांनी एकत्र येऊन नवे नवे अभ्यासक्रम सुरू करायला हवेत. सोलापूरला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते, आम्ही देखील शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र एकत्र आणून त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत, असेही त्या म्हणाल्या.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. विद्या लेंडवे यांनी केले. तंत्र साहाय्य डॉ. श्रीराम राऊत आणि प्रा. चंद्रकांत गार्डी यांचे लाभले.



यांचा झाला पुरस्काराने सन्मान
उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार :  प्राचार्य डॉ. रावसाहेब पाटील, के. एन. भिसे महाविद्यालय, कुर्डुवाडी
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: प्रा. डॉ. विकास घुटे, संगणकशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस
उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: श्री शशिकांत बनसोडे, कार्यालय अधिक्षक, हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर.
राजश्री शाहू महाराज पुरस्कार: सुलभा गोविंद बनसोडे,  भूशास्त्र संकुल, विद्यापीठ कॅम्पस


bottom of page