top of page

... आता पक्षनाव आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे गटाकडून याचिका दाखल!

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्याचबरोबर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून त्यांनी अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली असली, तरी ती अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून दाखल करून घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. न्यायालयाने यासंदर्भात ठाकरे गटाला उद्या पुन्हा याचिकेसंदर्भात मेन्शनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, ठाकरे गटाकडून याचिका दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाकडून या प्रकरणी कॅव्हेट दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेतानाही शिंदे गटाची बाजू न्यायालयाकडून ऐकून घेतली जाईल. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयासमोर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.


bottom of page