top of page
Writer's pictureMahannewsonline

तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा

पंढरपूर, एकवीरा तसेच लेण्याद्री देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी. ही कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

पंढरपूर, एकवीरा व लेण्याद्री तीर्थक्षेत्र विकासाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांचा तसेच वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आज ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, देवस्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून तीर्थक्षेत्र आणि परिसराचा उत्तम रितीने विकास होणे अपेक्षित आहे. विश्वस्त आणि प्रशासनात चांगला समन्वय साधून देवस्थान विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. एकवीरा देवस्थान परिसरात वनपर्यटन राबविणे शक्य असून त्यादृष्टीने वनविभागाने आराखडा करावा. तीर्थक्षेत्रांच्या परिसरात वनपर्यटन आणि कृषीपर्यटनावर अधिक भर दिल्यास परिसरात रोजगाराच्या संधी वाढण्यासह विकासाला चालना मिळेल.

एकवीरा देवस्थान येथे पायऱ्यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांना त्रास होतो. याच्या दुरूस्तीला प्राधान्य देण्यात यावे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची संख्या वाढविणे, त्यांच्यासाठी निवारा, सीसीटीव्हीची निगराणी आदींबाबत दक्षता घेण्यात यावी, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. जेजुरी देवस्थानच्या धर्तीवर येथील काम राज्य पुरातत्व विभागाने करण्याबाबत तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लेण्याद्री देवस्थान येथे सुरू असलेल्या कामाबाबत संबंधित विभागांनी वेळोवेळी स्थानिक नागरीक, लोकप्रतिनिधी, देवस्थान समिती यांना अवगत करावे, येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, पथदिवे आदी कामांना गती द्यावी. ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे असावीत. तसेच सीसीटीव्ही आणि मंदिरातील चांगली प्रकाश योजना याबाबतही समन्वयाने आराखडा करावा, अशा सूचना उपसभापती यांनी दिल्या. परिसरातील वनांचे संरक्षण करून येथे देखील वन पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाबाबत पुरातत्व विभागाने चांगले काम केल्याचे नमूद करून डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, वारकऱ्यांसाठी शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर योजना आखावी. भक्त निवास विकासाला चालना द्यावी. येथील पद्मावती उद्यानाचा सुयोग्य विकास करावा. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल आणि उपयोगिता यांचाही सातत्याने आढावा घ्यावा. वयोवृद्ध भाविकांसाठी दर्शन रांगेत विशेष व्यवस्था करण्यात यावी, असे सांगून त्यांनी नगरपालिका क्षेत्र तसेच मंदिर परिसरातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. या बैठकीत डॉ.गोऱ्हे यांनी एकवीरा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना अनेक दिवस पगार मिळाला नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा न्यायाधीशांशी संपर्क साधून आजच पगाराबाबत आदेश दिल्याची खात्री केली. याचे उपसभापतींनी विशेष कौतुक केले. या बैठकीत पुणे तसेच सोलापूर येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, केंद्र तसेच राज्य पुरातत्व विभागांचे अधिकारी यांनी देवस्थान आणि परिसरात सद्यस्थितीत सुरू असलेली कामे तसेच प्रस्तावित कामे आदींबाबत माहिती दिली.

bottom of page