top of page
Writer's pictureMahannewsonline

राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही

राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली असून तशा प्रकारच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

डेल्टा प्लसचे आतापर्यंत २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून काहीजण बरे होऊन घरीदेखील गेले आहेत. मोठ्या संख्येने रुग्ण नसले तरी शोध सुरु आहे. सर्व जिल्ह्यांमधून १०० नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये लसीकरण केलेल्यांना पुन्हा संसर्ग झालाय का वैगेरे अशी बाबी समजून घेत आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंदेखील ते म्हणाले. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं.

सध्या राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्याने चिंता व्यक्त आहे. काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाउन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असताना राजेश टोपे यांनी राज्यात निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.


bottom of page