महिलेने दिला चक्क तिळ्यांना जन्म! एक महिन्यानंतर तिन्ही बाळांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
जुळ्या मुलांचा जन्म हा आजही कौतुकाचा विषय आहे. मात्र, एका महिलेने चक्क तिळ्यांना (Triplet) जन्म दिल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. लग्नाच्या १७ वर्षांनंतर या महिलेने तिळ्यांना जन्म दिला. प्रसूतीनंतर सदर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले तर तिन्ही नवजात बाळांना जन्मानंतर नवजात शिशू विभागामध्ये (NICU) दाखल करण्यात आले. महिनाभराच्या उपचारानंतर तब्येत सुधारल्याने तिन्ही बाळांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सोलापूर शहरातील प्राजक्ता पोळ या महिलेने दि. २० नोव्हेंबर रोजी तीन बाळांना (Triplet) जन्म दिला आहे. लग्नानंतर तब्बल 17 वर्षानंतर प्राजक्ता गरोदर राहिली. सोनोग्राफीमध्ये तिळे Triplet) असल्याचे समोर आले. त्यामुळे गरोदरपणात सदर महिलेची विशेष काळजी घेतली गेली. मात्र, सातव्या महिन्यात सदर महिलेस श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने तिला तात्काळ अश्विनी सहकारी रुग्णालयात हलविण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी 'सिझेरियन सेक्शन'द्वारे प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कठीण परिस्थितीत स्त्रीरोगतज्ञ डॉ.सूर्यप्रकाश कारंडे व डॉ. अर्चना शहा यांनी सदर महिलेची सुखरूप प्रसूती केली. या महिलेने तिळ्यांना जन्म दिला. विशेष म्हणजे तीन ही मुलांच्या जन्मात एका मिनिटाचे अंतर आहे. बाळांचे वजन कमी असल्याने तिन्ही नवजात बाळांना अश्विनी सहकारी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात ठेवण्यात आले होते.
प्रसूतीनंतर सदर महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तिला सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. सदर महिलेवर डॉ. अनुपम शहा, डॉ. निर्मल तापडिया, डॉ. किरण जोशी, डॉ. हर्षल काकडे आदींनी यशस्वी उपचार केले. डॉ. आशुतोष यजुर्वेदी व त्यांच्या टीमने तीन ही बाळांवर योग्य ते उपचार करत बाळांची काळजी घेतली. महिनाभराच्या उपचारानंतर बाळांची तब्येत सुधारल्याने शनिवारी (दि.21 डिसेंबर ) रोजी त्या तिन्ही बाळांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिघांच्या जन्माने पोळ कुटुंबाचा आनंद तिप्पट झाला आहे.
नवजात शिशु विभागात दाखल करताना तीन बाळांचे वजन अनुक्रमे 1275 ग्रॅम, 1075 ग्रॅम आणि 1180 ग्रॅम वजन होते. तर रुग्णालयातून डिस्चार्ज देताना तिन्ही बाळांचे वजन अनुक्रमे 1750 ग्रॅम, 1705 ग्रॅम आणि 1635 ग्रॅमपर्यंत वाढले.