top of page
Writer's pictureMahannewsonline

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांना फोन...

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेले आहेत, शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा देखील इशारा दिलेला आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून येत्या 48 तासांत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती मिळतेय.

पुन्हा लॉकडाउन लावायला विरोधी पक्ष भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवलेला आहे. राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने, काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने आज मुख्यमंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. “राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोनवरील संवादात केलं आहे.” असं ट्विट मनसेकडून करण्यात आलेलं आहे.


bottom of page