लसीकरणातून कोरोनाविरूद्धची लढाई आम्ही लढू… आणि जिंकू!
जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाचे 1,48,914 डोज पूर्ण
सगळीकडे सध्या कोरोनाविरूद्ध लढा सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्येदेखील कोविड-19 चे काल 7 एप्रिल रोजीपर्यंत 30 हजार 500 एवढे बाधित रुग्ण आढळून आले असून 447 बाधीतांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या व अनेकांचे प्राण घेणाऱ्या या कोवडि-19 विषाणूची साखळी तोडणे हाच एकमेव पर्याय आजघडीला शिल्लक असून या संकटाच्या काळात, कोरोनावरील लस हीच आशेचा किरण दिसत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व त्यांची टिम कोविड-19 लसीकरण मोहीम जोरकसपणे राबवित आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात 7 एप्रिल अखेर 1 लाख 48 हजार 914 लसीकरणाचे डोज देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरवात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील 17 हजार 301 योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 17 हजार 573 आरोग्य सेवकांना पहिला डोज तर 11 हजार 189 जणांना दुसरा डोज देण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील 10 हजार 531 कोरोना योद्धांचे ऑनलाईन नामांकन करण्यत आले असतांना ऑनलाईन व ऑफलाईन मिळून 18 हजार 117 जणांना पहिला डोज व 4911 फ्रंट लाईन वर्कर यांना दुसरा डोज देण्यात आला आहे. अशा प्रकारे आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून 27 हजार 832 नोदणीकृत लाभार्थ्यांच्या तुलनेत पहिला व दुसरा असे 51 हजार 790 डोज देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व 60 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आता 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्वांनाच लस देण्याचे ठरविले गेले आहे. आतापर्यंत 77 हजार 310 जेष्ठ नागरिकांना पहिला डोज तर 536 नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. तसेच 19 हजार 169 व्याधिग्रस्त नागरिकांना पहिला डोज तर 109 व्याधिग्रस्त नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत एकूण 1 लाख 32 हजार 169 नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस तर 16 हजार 745 नागरिकांना दोन्ही डोज देण्यात आले असून एकूण 1 लाख 48 हजार 914 डोज जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना देण्यात आले आहेत. शासनाच्या नवीन नियमावलीनुसार 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्वच नागरिकांना कोरोना लस देण्यात येत असून जिल्हा प्रशासनाने यासाठीदेखील सुक्ष्म नियोजन तयार केले आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षणात जिल्ह्यात 22 लाख 42 हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यापैकी 60 वर्षावरील नागरिकांची 10 टक्के व 45 ते 60 वर्ष दरम्यानची लोकसंख्या 20 टक्के असे एकूण 30 टक्के म्हणजे 6 लाख 72 हजार 618 नागरिकांच्या लसिकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या नागरिकांचे लसीकरणासाठी 10 टक्के वाया जाणारा अतिरिक्त लस साठा गृहीत धरून 7 लाख 40 हजार पहिला डोजसाठा अपेक्षीत आहे. दोन्ही डोज पुर्ण करण्यासाठी सुमारे 14 लाख 80 हजार लससाठा लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुढील दोन महिन्यातच हे दोन्ही डोज द्यावे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनान आग्रही आहेत. आज घडीला जिल्ह्यात एकूण 98 लसीकरण केंद्र सुरू आहेत. विहित वेळेत हे काम पुर्ण करण्यासाठी जिल्ह्यात 200 लसीकरण केंद्र सुरू करावे लागणार आहेत. लस साठ्याच्या उपलब्धतेनुसार जिल्हा प्रशासनाद्वारे 200 लसिकरण केंद्र सुरू करण्याची तयारी देखील पुर्ण केली आहे.
नागरिकांनी कोरोना लसचे दोन डोस घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक डोस घेतल्यानंतर दुसरा डोस न घेण्याची चूक करू नये. कोविशील्ड लस घेणाऱ्यांनी दुसरा डोज पहिल्या डोजनंतर सहा ते आठ आठवड्यात तसेच कोव्हॅक्सीन लस चा दुसरा डोज चार आठवड्यांनी घ्यावा असे तज्ञांनी सूचविले आहे. दुसऱा डोज घेतल्याच्या दोन आठवड्यांनंतर, आपल्या शरीरामध्ये कोरोना विरूद्ध लढा देण्यास आवश्यक शक्ती विकसित होईल. त्यामुळे, लस घेतल्यानंतर लगेचच कोणताही निष्काळजीपणा न करता सतत मास्क वापरने, हात धुणे व सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे.
गृहीत धरण्यात आलेल्या सहा लाख 72 हजार 618 नागरिकांपैकी एक लाख 32 हजार 169 म्हणजेच 20 टक्के नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोज देऊन जिल्हा प्रशासनाने एक मजल पार केली आहे.
यापुढील टप्प्यात लस साठ्याच्या उपलब्धतेनुसार 45 वर्षाखालील नागरिकांचे देखील लसीकरणाबाबत शासन स्तरावर निर्णय होईलच. तेव्हा सर्वांनी लस घ्यावी जेणेकरून सर्वांच्या शरीरात कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आवश्यक ॲन्टीबॉडीज तयार होतील व जीवित हानी टळेल.
लसीकरणाच्या चक्रातून एक दिवस कोरोनाची साखळी देखील तुटेल. दैनंदिन जीवनचक्र व अर्थचक्र सुरू राहण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत आपल्या सर्वांना कोरोनाविरूद्धचा लढा सुरू ठेवायचा आहे, आणि मनात निर्धार ठेवायचा आहे की ‘आम्ही लढू व आम्ही जिंकू’ आणि कोरोनावर मात करू . . . .
- गजानन जाधव, माहिती सहायक,जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर. (9923380906)