top of page
Writer's pictureMahannewsonline

१ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना मिळणार कोरोना लस

आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने कोरोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केलं जात असून आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी स्पष्ट केलं. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला कोरोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहितीही जावडेकरांनी दिली.


आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये कोरोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे, असं जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसेच या बैठकीमधील दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की दोन डोसदरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्यादरम्यान घेणं योग्य ठरेल असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे, असंही जावडेकरांनी सांगितलं आहे.


bottom of page