top of page

अवघ्या पाच रुपयांवरून तरुणाला मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

अवघ्या पाच रुपयांसाठी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथे घडली. शहरातील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकातील वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरुन वाद झाले. या भांडणात एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, या युवकाला मारहाण करणाऱ्या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रविण रमेश कांबळे (वय ३५. रा. बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी प्रविण कांबळे हा एका वडापावच्या दुकानावर वडा घेण्यासाठी गेला होता. यावेळी दुकानदाराने त्याला वडापाव २० रुपयांना आहे असे सांगितले. त्यावर ५ रुपये कमी करा यावरुन दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. आणि या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. प्रविण कांबळे याला बेदम मारहाण केली गेली. त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी (२७ एप्रिल) सकाळी प्रविण कांबळे याचा मृत्यू झाला.

प्रविण कांबळे याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.


bottom of page